कोल्हापूर : महाराष्ट्रातील आगामी ऊस गाळप हंगामाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. गाळप हंगाम सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिल्याने राज्यातील साखर कारखान्यांनी तयारीला वेग दिला आहे. कारखान्यांमध्ये यंत्रसामग्री दुरुस्ती व देखभालीबरोबरच ऊस वाहतूक, कामगारांची उपलब्धता तसेच अन्य तांत्रिक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मागील हंगामात ज्या कारखान्यांमध्ये यंत्रसामग्रीशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या होत्या, तेथे आवश्यक दुरुस्ती व बदलांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे गाळप प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
‘चीनीमंडी’शी बोलताना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले कि, आतापर्यंत गाळप परवान्यासाठी राज्यातील 88 सहकारी आणि 90 खाजगी अशा 178 साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या पातळीवर 53 अर्जांची छाननी सुरु आहे. गाळप परवाना मिळवण्यासाठी कारखान्यांनी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित कारखान्यांनी मागील हंगामातील एफआरपीचे १०० टक्के बिल अदा केलेले असणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘चीनीमंडी’शी बोलताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू समूहाचे मार्गदर्शक समरजितसिंहराजे घाटगे म्हणाले की, गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आमची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांशीही सातत्याने संपर्क ठेवण्यात आला आहे. नियोजित वेळेत गाळप सुरू करून उसाचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि संपूर्ण हंगामात गाळप प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहावी, यासाठी कारखाना व्यवस्थापनासह आमची संपूर्ण टीम सज्ज आहे.
ऊसतोडणी आणि वाहतुकीची तयारी
साखर कारखान्यांकडून ऊसतोडणीसाठी मजुरांची उपलब्धता, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकची व्यवस्था करण्यात येत आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसाठी कंत्राटदार तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय सुरू करण्यात आला आहे.शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडला जावा आणि तोडणीनंतर लवकरात लवकर कारखान्यापर्यंत पोहोचविला जावा, यासाठी कारखान्यांकडून नियोजन करण्यात येत आहे. यामुळे उसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबरच कारखान्यांच्या दैनंदिन गाळप क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांकडूनही तयारीची लगबग
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गाळप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असतो. ऊसतोडणी आणि कारखान्याला ऊस पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना संबंधित साखर कारखान्यांशी समन्वय ठेवावा लागणार आहे. ऊस पावती, वजन, वाहतूक आणि ऊस बिलाच्या देयकाची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यावरही कारखान्यांकडून लक्ष केंद्रित केले जात आहे.१५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याने आगामी काही दिवसांत साखर कारखान्यांमधील तयारीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. कारखाना प्रशासन, तांत्रिक कर्मचारी आणि ऊस विभागाकडून गाळप हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समन्वय साधला जात आहे.


















