सातारा : कृष्णा कारखान्याच्या प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासद आणि कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. येत्या काळात कृष्णा कारखान्याला आणखी प्रगतिपथावर नेऊ, असे ग्वाही यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सुमारे १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅटट्रिक साधली. या विजयामुळे कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर डॉ. भोसले आणि विनायक भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, “राज्यातील आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” दरम्यान, डॉ. भोसले व श्री. भोसले यांचे कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या वर्षावात परिसर दुमदुमून गेला. यावेळी नूतन संचालक बाबासाहेब शिंदे, संग्राम पाटील, बाजीराव थोरात, सत्यजित पाटील, बाळासाहेब जगताप, छबन कांबळे, संजय पाटील, विलास भंडारे, दिलीप पाटील, सभापती नंदाताई यादव, शैलजा शिंदे, रोहिणी शिंदे, शिवाजीराव थोरात, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, प्रकाश देसाई, धनाजी जाधव, रमेश मोहिते, कारखान्याचे डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर यांच्यासह कऱ्हाड, वाळवा व कडेगाव परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी सभासद उपस्थित होते.


















