कोल्हापूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौऱ्यात दोन महत्वाच्या घोषणा केल्या. पुण्याच्या बंद पडत चालेल्या ‘नॅशनल हेवी’ चे पुनरूजीवन करण्यासाठी १५०० कोटीची घोषणा केली. तर उपपदार्थ न बनवणाऱ्या कारखान्यांसाठी कोल्हापुरात सहकारी तत्वावरील प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली. हे दोन्हीही प्रकल्प सर्वाधिक साखर कारखाने आणि साखर उत्पादन असलेल्या महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहेत. मात्र, देशातील साखर उद्योगाला स्वदेशी आणि कमी किंमतीत यंत्रसामग्री उपलब्ध करून देणारी व अलिकडच्या काळात शेवटची घटका मोजत असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटीव्ह संस्थेचे पुनरूजीवन हे देशातील साखर उद्योगाला वरदान ठरणार आहे.
केंद्रीय मंत्री शहा यांनी केलेल्या घोषणेनंतर संस्थेत केवळ साखर उद्योगासाठीच नाही तर दुग्ध, बायोगॅस, कृषीसह संलग्न क्षेत्रासाठीची अधुनिक उपकरणे तयार करून ही संस्था राष्ट्रीय उत्कृष्ठता केंद्र (सेंटर फॉर एक्सलन्स) बनविण्याची योजना आहे. नॅशनल हेवी इंजिनीअरिंग संस्थेत थेट ४५० तर अप्रत्यक्ष ५०० कर्मचारी कार्यरत होते. या प्रकल्पातून कोल्हापूरसह सांगली, सातारा व कर्नाटकातील बहुंताशी कारखान्यांना यंत्रसामग्रीचा पुरवठा झाला आहे. त्यामुळेच सहकारी साखर उद्योगाच्या इतिहासात या संस्थेचे स्थान मोठे आहे. राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष, स्पर्धेच्या युगात प्रकल्पात न झालेले बदल आणि अन्य कंपन्यांकडून तत्काळ आणि कमी किंमतीत मिळणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे ‘नॅशनल हेवी’ ला घरघर लागली. आता हे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















