साखर उद्योगाच्या मदतीसाठी तातडीच्या उपाययोजना हव्यात : एमएसपी, इथेनॉल दरवाढीसारखे मूळ प्रश्न सोडविण्याची गरज

कोल्हापूर : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात सहकारी साखर कारखान्यांसाठीच्या प्रकल्पांची घोषणा केली. त्याशिवाय नॅशनल हेवी इंजिनीअरिंगच्या पुनरुज्जीवनावरही भाष्य केले. मात्र, साखर उद्योगाला तातडीच्या उपायांची गरज आहे. त्यामध्ये साखरेच्या हमीभावात वाढ करून तो प्रतिक्विंटल ४३०० रुपये करावा ही मुख्य मागणी आहे. सध्या साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये आहे, या दर फरकामुळे कारखाने तोट्यात आहेत.

एफआरपीच्या तुलनेत साखरेला चांगला हमीभाव अपेक्षित आहे. तसेच इथेनॉलच्या दरात दोन वर्षांपासून वाढ नाही, ती तातडीने करावी, इथेनॉल प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा ६ टक्के परतावा मिळावा या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांविषयी सकारात्मक घडामोडी झाल्या असत्या तर त्याचा साखर उद्योगाला निश्चितच लाभ झाला असता असे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दोन दिवसांच्या दौऱ्यात शहा यांनी कोल्हापुरात १५०० कोटी रुपये खर्च करून साखर उद्योगासाठी सहकारी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. पण हा दीर्घकालीन उपाय आहे. जे कारखाने इथेनॉलसह अन्य उपपदार्थ घेत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे; सध्या अपवाद सोडला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखाने उपपदार्थ तयार करतात. साखर कारखान्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न हे साखर विक्रीतून होते, तर २० टक्केच उत्पन्न उपपदार्थांपासून आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढविण्याची घोषणा अपेक्षीत होती. साखर उद्योगाच्या मूळ मागणीकडेच दुर्लक्ष झाले आहे.

केंद्र सरकारने ‘लवकर निर्णय घेऊ’ या आश्वासनापलीकडे काही केलेले नाही. इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात साखर उद्योगाचा वाटा वाढण्याची गरज आहे. दुसरीकडे इथेनॉलच्या दरात दोन वर्षांपासून एक रुपयांचीही वाढ झालेली नाही. या दरात वाढ करण्याची मागणीही दुर्लक्षित आहे. सद्यस्थितीत नव्या प्रकल्पांतून सहकारी साखर कारखानदारीला मिळणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here