बायोगॅस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक : प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अतुल मुळ्ये

कोल्हापूर : सध्या देशात केंद्र सरकारकडून गोबरधनच्या माध्यमातून बायोगॅस उत्पादनाला चालना दिली जात आहे. शाश्वत बायोगॅस उत्पादन ही काळाची गरज असल्याचे मत प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अतुल मुळेय यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथे प्राज इंडस्ट्रीजतर्फे आयोजित सीबिजी वर्कशॉपमध्ये मुळ्ये बोलत होते. ते म्हणाले, विशेष म्हणजे आजच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे गोबर्धन योजनेचे अनावरण करत असून हा सकारात्मक योगायोग असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे नसून, उद्योग आणि समाजासमोरील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर व्यवहार्य उपाय शोधणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2036 पर्यंत ‘गोबरधन’चे 5 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट

ChiniMandi WhatsApp Channel

भारतातील जैवऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी गोबरधन (GOBARdhan) उपक्रमांतर्गत 2036 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत साखर कारखानदारांना कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले. या परिषदेचा प्रमुख उद्देश साखर कारखानदारांना कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) क्षेत्रातील उपलब्ध संधी, त्यातील गुंतवणुकीची क्षमता आणि जैविक कच्च्या मालापासून ऊर्जा निर्मितीचे फायदे याबाबत माहिती देणे हा होता.

कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रातील बाजारविकासाच्या दिशेने प्राज इंडस्ट्रीज ने पहिला टप्पा कोल्हापुरातून सुरू केला आहे. कोल्हापूर हा साखर उद्योग आणि प्रेसमडच्या मुबलक उपलब्धतेसाठी ओळखला जाणारा प्रदेश आहे. साखर कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या प्रेसमडसह इतर जैविक अवशेषांकडे यापूर्वी अनेकदा कचरा किंवा टाकाऊ पदार्थ म्हणून पाहिले जात होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने याच कच्च्या मालाचे रूपांतर मूल्यवर्धित उत्पादन आणि हरित ऊर्जेत करता येऊ शकते.

बायोगॅस उत्पादनासाठी कच्चा माल संकलित करण्याचे आव्हान

केंद्र सरकारने 5 हजार बायोगॅस प्रकल्प उभा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असले तरी अद्याप देशभरात 200 प्लांटचे उद्दिष्टही गाठता आले नसल्याचे मुळ्ये यांनी सांगितले. मुळ्ये म्हणाले कि, बायोगॅस प्रकल्पांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे बायोगॅस उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल संकलित करण्याचे. विशेष म्हणजे परदेशात फीडस्टोक उपलब्ध करण्यासाठी ज्या अडचणी आहेत, सुदैवाने आपल्या देशात तशी अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, उपलब्ध कच्चा मालातून जास्तीत जास्त बायोगॅस कसे उत्पादित करायचे, यावर भर देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

बायोगॅस उत्पादित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

कमीत कमी कच्चा मालाचा वापर करून जास्तीत जास्त बायोगॅस उत्पादित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे मुळ्ये म्हणाले. बायोगॅस उत्पादनात प्रामुख्याने तीन टप्पे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील पहिला टप्पा म्हणजे कच्चा मालावर योग्य प्रक्रिया करणे. जर आपण कच्चा मालावर योग्य प्रक्रिया केली नाही तर रिअक्टरला बायोगॅस उत्पादनासाठी चांगला कच्चा माल जाणार नाही आणि रिअक्शन चांगली झाली नाही तर उत्पादित होणारा बायोगॅस चागंला दर्जाचा निर्माण होणार नाही. त्यामुळे बायोगॅस उत्पादनासाठी तिन्ही टप्पे महत्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

उद्योगांसाठी तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक

आजच्या काळात उद्योगांसाठी तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. प्राज इंडस्ट्रीज बायोगॅस उत्पादनासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. या तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, खर्च कमी करणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे शक्य झाल्याचे मुळेय यांनी स्पष्ट केले. कोणतेही तंत्रज्ञान स्वीकारताना त्याची उपयुक्तता, खर्च, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन परिणाम यांचा विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येक उद्योगासाठी एकच तंत्रज्ञान योग्य असेलच असे नाही, त्यामुळे प्राज स्थानिक गरजेनुसार तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाश्वत विकासाला प्राधान्य

उद्योगांचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. उत्पादन वाढवतानाच ऊर्जा बचत, पाण्याचा कार्यक्षम वापर, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनवता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा समन्वय अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here