उत्तराखंड : हरिद्वार आणि डेहराडूनमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रात घट, उसासाठी साखर कारखान्यांची होणार दमछाक

काशीपूर : राज्यात उधम सिंग नगरमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाल्याचे, तर हरिद्वार आणि डेहराडूनमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. ऊस विकास आणि साखर उद्योग आयुक्त त्रिलोक सिंग मार्टोलिया यांनी मंगळवारी ऊस सर्वेक्षण आणि विकास कामांच्या आढावा बैठकीदरम्यान राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्राची माहिती सादर केली. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थिती स्पष्ट करून या घटीच्या कारणांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यातील सर्व सहायक ऊस आयुक्त आणि वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक या बैठकीत सहभागी झाले होते.

ऊस सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या दुहेरी नोंदींमधील चुका तात्काळ दुरुस्त करण्याचे आणि शून्य-संकेत स्वरूपात नोंदवलेले ऊस क्षेत्र संबंधित शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, सर्वेक्षणाची कागदपत्रे पूर्णपणे पारदर्शक आणि अद्ययावत असावीत. विभागाचे आणि ऊस समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी खतांची गोदामे ऑनलाइन प्रणालीशी जोडण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वरिष्ठ ऊस विकास निरीक्षकांना आपापल्या भागातील ऊस क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकरिता प्रशिक्षण, चर्चासत्रे आणि नियमित संपर्क मोहीम आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत संयुक्त ऊस आणि साखर आयुक्त हिमानी पाठक, प्रसिद्धी आणि जनसंपर्क अधिकारी निलेश कुमार, सहायक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंग, आशिष नेगी, कपिल मोहन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here