कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ऊसतोड तातडीने थांबवून साखर कारखाने बंद करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. या गोंधळात कार्यालयाच्या दरवाजाच्या काचांची तोडफोड झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सौरभ शेट्टी, अरुण मगदूम आणि शैलेश चौगुले या तिघांना ताब्यात घेतले.
सौरभ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करण्यापूर्वीच गाळप सुरू केले असून, हे कारखाने तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. ऊसदर निश्चित झालेला नसताना कारखान्यांना सुरू करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना केला.
यावेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. २०२२ मध्ये एफआरपी तीन टप्प्यांत देण्यासंदर्भातील कायदा रद्द झाल्याचा मुद्दाही चर्चेत आला. मात्र, यावेळी अधिकाऱ्यांकडून १९६२ चा कायदा रद्द झाल्याचे सांगितले जात असल्याने आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
त्यानंतर सहसंचालकांनी आंदोलकांना काही वेळ कार्यालयाबाहेर थांबण्यास सांगितले. दरम्यान, कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पोलिसांना बोलावण्याची गरज नव्हती. चर्चेला वेगळे वळण देऊ नये, असे आवाहन आंदोलकांनी केले होते, असे सांगण्यात आले.
मात्र, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. कार्यालयाच्या दरवाजातून बाहेर पडताना झालेल्या गोंधळात काचा फुटल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी सौरभ शेट्टी, अरुण मगदूम आणि शैलेश चौगुले यांना ताब्यात घेतले.


















