कोल्हापूर : देशातील साखरेची संभाव्य टंचाई आणि वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साखर हंगाम ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेतकरी आणि साखर कारखानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने हंगाम लवकर सुरु करण्यास वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) विरोध दर्शविला आहे. असे असले तरी यंदाचा साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करायचा की नोव्हेंबरपासून, याचा फैसला उद्या (९ सप्टेंबर) होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या साखर हंगामाचे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक उद्या होणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेची टंचाई आणि वाढलेले दर हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस उपलब्धतेपासून कारखान्यांच्या आर्थिक अडचणींपर्यंत अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच गाळप सुरू करण्यास साखर उद्योगातील संघटनांचा विरोध आहे.
यंदा ऊस उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता
गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाल्याने सुमारे १४ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नवीन ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे. सध्या राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के ऊस खोडवा आहे. परिणामी, यंदा ऊस तसेच साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यातील साखर कारखान्यांची एकत्रित दैनंदिन गाळप क्षमता सुमारे १०.४ लाख टन आहे. मात्र, ऊस उपलब्धता कमी असताना १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास प्रत्यक्ष गाळप हंगामाचा कालावधी १०० दिवसांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांवरील आर्थिक दबाव आणखी वाढण्याची भीती साखर उद्योगातून व्यक्त केली जात आहे.
अपरिपक्व उसामुळे उताऱ्यात घट होण्याची भीती
महाराष्ट्रात साधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ऊस पूर्णपणे पक्व होतो. त्यापूर्वी, म्हणजे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान अपरिपक्व उसाचे गाळप केल्यास साखर उतारा १ ते १.५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. यामुळे साखर कारखान्यांना प्रतिटन सुमारे ४५० ते ५०० रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. हंगाम लवकर सुरू केल्यास कारखान्यांना प्रतिटन ७५० ते ८०० रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपूर्वी गाळप करण्यात आलेल्या उसासाठी राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे प्रतिटन ७५० रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विस्माने केली आहे.
साखरेचे दरही घसरले
ऑगस्टच्या सुरुवातीला साखरेच्या एक्स-फॅक्टरी दरात काही काळ वाढ झाली होती. मात्र, केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना आणि १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याच्या निर्णयानंतर साखरेच्या दरात घट झाली आहे.त्यातच एफआरपी आणि ऊसतोडणी मजुरीत झालेली वाढ लक्षात घेता यंदा साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर हंगाम लवकर सुरू करायचा की ऊस पक्व होईपर्यंत प्रतीक्षा करायची, या सर्व बाबी मंत्री समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर अवलंबून आहेत.


















