साताऱ्यात ऊसदर आंदोलन पुन्हा पेटणार? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजपासून ऊसतोडणी व वाहतूक बंदचे आवाहन

सातारा : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न ३,९०० रुपये अधिक १०० रुपये आणि साखरेचे दर वाढल्यास आणखी २०० रुपये, अशा एकूण ४,२०० रुपयांच्या तोडग्याने मार्गी लागला आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दर जाहीर होईपर्यंत ऊसतोडणी आणि ऊस वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, दादासाहेब यादव आणि प्रमोदसिंह जगदाळे यांनी शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत साखर कारखानदार ऊसदर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत ऊसतोडणी आणि वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वर्षभर मोठा खर्च करावा लागतो. वाढलेली मजुरी, खते, कीटकनाशके, औषधे आणि पाणी यांचा खर्च लक्षात घेता उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. मात्र, कारखानदारांकडून दर जाहीर न करताच ऊसतोडणी आणि वाहतूक सुरू ठेवली जात असल्याने संघटनेने याला विरोध दर्शविला आहे.

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी केवळ चर्चेवर अवलंबून न राहता आता प्रत्यक्ष आंदोलनात उतरावे लागेल, अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी होऊन ऊसतोडणी आणि ऊस वाहतूक बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदारांकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने आता शेतकऱ्यांच्या एकजुटीची कसोटी लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तोडगा निघाला असताना सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत ऊसतोडणी आणि वाहतूक बंद ठेवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.

गावोगावी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी काळात कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here