सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, सोनहिरा साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार ९०० रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे. एकूण १ लाख ४९ हजार टन उसापोटी ५८ कोटी १३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम आणि संचालक आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू आहे. तसेच कारखान्याचे सर्व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, असे मोहनराव कदम यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे सोनहिरा कारखान्याने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. परिसरातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी सोनहिरा कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी कारखान्याचे संचालक डॉ. शांताराम कदम, सर्व संचालक मंडळाचे सदस्य आणि कार्यकारी संचालक सुहास देसाई उपस्थित होते.

















