अहिल्यानगर : समाज कल्याण विभागाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या ग्रामपंचायत विभागासह जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या सहकार्याने स्मार्ट सर्विसेसच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आज (९ तारखेला) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त प्रवीण कोरगंटीवार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यातील एकूण २,५४३ ऊसतोड कामगारांची नोंद झाली असून त्यापैकी १,२८५ कामगारांची ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. प्रतीकात्मक स्वरूपात सपना अरविंद राठोड आणि अनिल सिनाप्पा फुलमाळी यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रांमुळे कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार असून त्यांच्या हक्कांचे संरक्षणही अधिक प्रभावीपणे होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी सांगितले की, ऊसतोड कामगार हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या उपक्रमामुळे त्यांना शासकीय सुविधा, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.

















