अहिल्यानगर : राहुरी तालुक्यात ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुकादम असलेले दिलीप नवनाथ ढोकणे (वय ४६, रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धुळे जिल्ह्यातील मोरदंड तांडा येथील लक्ष्मण उखा चव्हाण याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास १३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन १० लाख ८० हजार रुपये तसेच २० हजार रुपये रोख असे एकूण ११ लाख रुपये देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत दिलीप ढोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२४-२५ च्या गाळप हंगामासाठी ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्यासाठी मोरदंड तांडा-जि. धुळे येथील लक्ष्मण उखा चव्हाण याच्याशी संपर्क साधला होता. ६ जुलै २०२४ रोजी उंबरे येथे ९ बैलगाड्यांवर १८ पुरुष व १८ महिला अशा ३६ ऊसतोड मजुरांचा पुरवठा करण्याचा करार झाला. यासाठी २० हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले. त्यानंतर ११ जुलै रोजी आरोपीच्या खात्यावर १ लाख रुपये ऑनलाइन पाठविण्यात आले. १५ जुलै २०२४ रोजी करारनामा करण्यात आला. यानुसार, अंबालिका शुगर प्रा. लि., कर्जत कारखान्यासाठी ऊसतोड करण्यात येणार होती. मात्र संशयिताने मजूर पुरविले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ढोकणे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी राहुरी पोलिस तपास करीत आहेत.


















