अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतक-यांसाठी ऊस शेतीतील कृत्रीम बुध्दीमत्ता (ए आय) आढावा व हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी डॉ. एन. एन. पाटील यांनी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याने सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी कार्यक्षम वापर केला आहे. कारखान्याचे युवा अध्यक्ष आ. विवेक कोल्हे हे कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या राज्यस्तरीय समितीवर काम करीत असल्याने त्यातून सभासद शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात हमखास वाढीसाठी चांगली संधी मिळू शकेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कृषीतज्ज्ञ व बारामती कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापक एम. ए. जाधव, एस. ए. वालकुंदे, एस एस. पडोळ, नितीन शिंदे यांनी कृषक, मॅप मायक्रो क्रॉप व फसल अप बाबत माहिती देवून मार्गदर्शन दिले. शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचे शंका निरसन केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार शितोळे यांनी हुमणी कीड नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देवून त्यासाठी प्रकाश सापळे कसे वापरावयाचे याचे मार्गदर्शन केले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा सादर करताना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे हे ऊस उत्पादन वाढीसाठीच्या धडक योजना राबवत असल्याचे सांगितले. संचालक बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, विलासराव माळी, कैलासराव माळी, साहेबराव रोहोम, शरद थोरात, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, राहुल वक्ते आदींसह शेतकरी उपस्थित होते. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.


















