बीड: माजलगाव तालुका आणि मतदारसंघात तीन साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळप केले आहे. काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची बिले जमा केली आहेत. शेतकऱ्यांच्या उसाची बिले विविध बँकांमध्ये जमा होत असताना, बँकांकडून पैसे नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. आधी कारखानदारांकडून आणि आता बँकांकडून शेतकऱ्यांचे पैसे देण्यास अडवणूक केली जात आहे. बँकांकडून तुटवड्याचे कारण देऊन पैसे देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
माजलगाव येथील येथील चेस्ट बँक परळीत हलवल्यामुळे येथील बँकांना पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी परळीत जावे लागत आहे. बँकांना पैसे आणण्यासाठी वाहनाचा खर्च वाढला आहे. वाहनात पैसे आणतानाही सुरक्षेशी संबंधित कारणे पुढे करत बँका कमी पैसे आणताना दिसून येतात. त्यामुळे बँकांकडून व्यापारी आणि शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, पूर्णवादी नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी तात्यासाहेब शेंडगे यांनी सांगितले की, बँकेकडे रोख उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही शेतकरी व व्यापाऱ्यांना जशी कॅश उपलब्ध होईल तशी कॅश देत आहोत. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी ऑनलाइन व्यवहार केल्यास त्यांना कितीही व्यवहार करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार करावा.


















