नवी दिल्ली : देशात चालू हंगामाच्या सुरुवातीला साखर उत्पादनात मोठी वाढ झाली असतानाही किरकोळ बाजारातील साखरेचे दर उच्च पातळीवर कायम आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या (DoCA) आकडेवारीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी देशातील साखरेचा सरासरी किरकोळ दर ६०.५३ रुपये प्रतिकिलो नोंदवण्यात आला. मागील वर्षी याच दिवशी हा दर ४६.६१ रुपये प्रतिकिलो होता. म्हणजेच वर्षभरात साखरेच्या दरात जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ११ ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात आलेल्या ५४.९२ रुपये प्रतिकिलो या दराच्या तुलनेतही नोव्हेंबरमध्ये साखरेचे दर वाढले आहेत.
इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (ISMA) आकडेवारीनुसार, ५ नोव्हेंबरपर्यंत देशात १२.८५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. मागील वर्षी याच कालावधीत केवळ ३.२० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच साखर उत्पादन जवळपास चारपट वाढले आहे.
५ नोव्हेंबरपर्यंत देशातील एकूण १८४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. मागील वर्षी याच कालावधीत १५४ कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. यावरून यंदा गाळप हंगामाला तुलनेने लवकर सुरुवात झाल्याचे स्पष्ट होते. चालू हंगामाच्या सुरुवातीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. ISMA च्या आकडेवारीनुसार, ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १३६ साखर कारखान्यांनी १०.७८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील १०१ कारखान्यांनी केवळ १.२३ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र आकडेवारीनुसार, ११ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १४३ साखर कारखान्यांनी १७६.९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १५.००२२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे.एकीकडे साखर उत्पादनात मोठी वाढ होत असताना दुसरीकडे किरकोळ बाजारातील दर मात्र कमी झालेले नाहीत. त्यामुळे उत्पादनातील वाढीचा फायदा ग्राहकांपर्यंत कधी पोहोचणार, याकडे लक्ष लागले आहे.


















