कोल्हापूर : दरवर्षी मे आणि जून या महिन्यात होणाऱ्या वळवाच्या पावसामध्ये हुमणी किडीचे भुंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर येतात. सध्याही अशीच स्थिती आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे बाहेर येण्याच्या मे- जून महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या वळवांच्या पावसावेळी सामूहीक प्रयत्न करणे आवश्यक असते. किडीच्या सामुदायिक नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर प्रभावी ठरतो. एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते, असा सल्ला परभणीच्या कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विषय विशेषज्ज्ञ डॉ. अमोल काकडे, डॉ. प्रशांत भोसले यांनी दिला आहे.
याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, हुमणीच्या भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. एक मोठे प्लॅस्टिकचे घमेले, त्यामध्ये १००/२०० वॉटचा बल्ब, डिझेल किंवा रॉकेल हे साहित्य येथे वापरावे. शेताच्या बांध, कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एका खांबावर ५-६ फूट उंचीवर वायरची व्यवस्था करून बल्ब लावावा. त्याच्या बरोबर खाली ३-४ फूट व्यासाचे घमेले ठेवावे. त्यात पाणी घेऊन थोड्या प्रमाणात डिझेल किंवा रॉकेल मिसळावे. १ हेक्टर क्षेत्रासाठी १ ते २ प्रकाश सापळे पुरेसे असतात. दररोज संध्याकाळी ७ ते ९ पर्यंत हे सापळे लावावेत. मेअखेर ते जून महिन्याच्या सुरुवातीला हा उपक्रम सतत राबवावा. हिला चांगला पाऊस पडल्यानंतर लगेचच हे सापळे लावल्यास जास्तीत जास्त भुंगेरे गोळा होतात. यातून किडीचे नियंत्रण होते. यंदा हुमणीचे भुंगेरे मॉन्सून पाऊस सुरू होईपर्यंतच म्हणजेच २० ते २५ जूनपर्यंत दिसतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरीत्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


















