सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश बाबा भोसले यांनी कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक कारभार यावर भर देत पुढील वाटचालीचा स्पष्ट रोडमॅप मांडला. शेतीला पाणी व उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर वाढविण्यावर भर राहील, असे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. बाबरमाची येथे आयोजित शेतकरी सभासद संवाद मेळावा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
कारखाना निवडणुकीत विरोधक कोण आहे? हे महत्त्वाचे नाही, तर प्रगतीचा विचार महत्त्वाचा आहे. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून या सहकाराच्या मंदिरांमध्ये जाण्याची भुमिका जी पहिल्यांदा स्वीकारावी होती आणि आजही तीच आहे. त्यासाठी गावातील गटतट बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. मागील ११ वर्षांमध्ये संचालक मंडळाने कोणताही वायफळ खर्च केला नाही. पारदर्शक कारभार केला म्हणून महाराष्ट्रात पहिल्या पाच कारखान्यात आपल्या कारखान्याचे नाव आहे. विरोधकांच्या आरोपाला आपण योग्य वेळी योग्य उत्तर देऊच असेही डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिवद्ध आहोत. पारदर्शक कारभारामुळे कारखान्याने राज्यात अग्रस्थान मिळवले आहे. त्यांनी शेतीसाठी पाणी, पाणंद रस्ते व वीज सवलतींसाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा यांनी सांगितले.यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे व धनाजी पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक अधिकराव पाटील यांनी केले. आभार दत्तात्रय पाटील यांनी मानले.


















