जालना : येथील समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक एक व दोनच्या गाळपास गुरुवारी (ता. १५) कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे-पाटील व महेंद्र मेठी यांच्या हस्ते मोळीपूजन करून प्रारंभ करण्यात आला. कारखान्याकडून पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपानुसार जानेवारीपासून हंगामाच्या अखेरपर्यंत प्रतिटन ५० ते ३०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मागील हंगामातील उसासाठी आतापर्यंत प्रतिटन २,९०० रुपये देण्यात आले आहेत. दिवाळीत प्रतिटन १०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्यात येणार असून, दुष्काळाचे संकट असतानाही उसाला उच्चांकी भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी यावेळी दिली.
चेअरमन घाटगे-पाटील म्हणाले की, कारखान्याच्यावतीने दुष्काळग्रस्त पाच गावे दत्तक घेऊन तेथे आवश्यक सुविधा स्वखर्चातून पुरविण्यात येणार आहेत. जायकवाडीच्या डाव्या कालव्याला चार आवर्तने मिळावीत, यासाठी सरकार व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासह गरज पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना उच्चांकी भाव देणारा कारखाना यंदाही शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे. दोन युनिटमुळे कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १२ हजार मेट्रिक टन झाली आहे. त्यामुळे १०० ते १२० दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यंदा ७५० ऊसतोड टोळ्या कार्यरत राहतील. शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांना ऊस देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.


















