बेळगाव : एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने बेळगाव शुगर प्रा. लिमिटेड या साखर कारखान्याला उत्तर कर्नाटक विभागातील २०२४-२५ वर्षातील उत्कृष्ट तांत्रिक कार्य प्रदर्शनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेच्या सभागृहात १९ व्या वार्षिक सर्वसाधारण महासभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वस्त्रोद्योग, ऊस विकास, साखर संचालनालय व कृषी बाजार मंत्री शिवानंद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
बेळगाव शुगर्स प्रा.लि.चे चेअरमन व सीएफओ प्रदीप कुमार इंडी, वरिष्ठ उपाध्यक्ष एल. आर. कारगी तसेच तांत्रिक विभागाचे उपाध्यक्ष ए. एस. राणा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याबाबत कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थापक अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव शुगर्सने सातत्याने प्रगती साधली आहे. चेअरमन प्रदीपकुमार इंडी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन मंडळाचे निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य तसेच अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांच्या संयुक्त परिश्रमामुळे हा सन्मान मिळाला आहे. एस. निजलिंगप्पा साखर संस्था ही साखर उद्योग आणि ऊस शेतीसंदर्भात राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत आहे.


















