कर्नाटक : नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी शिरगुप्पी शुगरसमोर कामगारांचे आंदोलन

अथणी : शिरगुप्पी शुगर वर्क्सच्या उभारणीसाठी १९९३ मध्ये आपल्या पूर्वजांनी सुमारे ४३ एकर जमीन दिली होती. त्यावेळी कारखान्याच्या मालकांनी जमिनीच्या मोबदल्यात कारखान्यात नोकरी देऊन सेवा कायम करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ३३ वर्षे उलटूनही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. आजही कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जात असून, कायमस्वरूपी नोकरीचा आदेश दिला जात नसल्याची तक्रार करत २० कामगारांनी सोमवारी कारखान्यासमोर आंदोलन केले. या मागणीसाठी यापूर्वी २०२० मध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कामगारांनी सांगितले.

आंदोलनकर्त्या कामगारांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या उभारणीसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही कारखाना व्यवस्थापनाने त्याची पूर्तता केलेली नाही. सुमारे २० कामगारांचा हा प्रश्न प्रलंबित आहे. या मागणीसाठी सोमवारपासून कारखान्यासमोर आंदोलन सुरू केले. आमच्या मागण्यांची दखल घेऊन कारखान्याच्या व्यवस्थापनाने तातडीने सेवा कायम करून त्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणी सुमित कांबळे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात प्रशांत कांबळे, पिंटू देवणे, अस्लम सार्वान, राजू दोंडरे, अरुण बजंत्री, प्रेमकुमार चौहान, सागर साने यांच्यासह २० कामगार सहभागी झाले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here