कोल्हापूर : अपुऱ्या पावसामुळे ऊस लागवड रखडली; रोपवाटिकांकडील मागणी जवळपास ठप्पच

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक रोपवाटिका असलेल्या शिरोळ व हातकणंगले परिसरातील बहुतांश रोपवाटिकांमध्ये चार ते पाच लाख ऊस रोपे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी लागवड पुढे ढकलल्याने रोपांची उचल होत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांचा पुरवठा होत असतो. मात्र यंदा अनियमित पावसामुळे नियोजन विस्कळीत झाले आहे. अपुऱ्या पावसाने ऊस लागवडीचा वेग मंदावला आहे. त्याचा थेट फटका ऊस रोपवाटिका व्यवसायाला बसला आहे. येत्या पंधरा दिवसांत पावसाचा जोर वाढला नाही, तर रोपांची अतिरिक्त वाढ होऊन त्यांची गुणवत्ता व विक्रीक्षमता कमी होण्याची भीती रोपवाटिका चालकांना आहे. यंदा पुणे, इंदापूर रोपांना मागणी वाढली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध आल्याने ऊस रोपांचा पुरवठा मंदावला आहे. पालखी मार्गावर वाहतुकीला मर्यादा आल्याने रोपवाटिका चालकांना वेळेत पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

शिरोळ व हातकणंगले या दोन्ही तालुक्यांत सध्या रोपांचा पुरवठा अवघ्या ३० टक्क्यांवर आला आहे. रोपवाटिका चालकांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ठेवले असले तरी मागणी नसल्याने रोपे अडकून पडली आहेत. रोपवाटिका चालकांना एक ऊस रोप तयार करण्यासाठी कच्चा माल, ऊस आणि मजुरी मिळून सुमारे १.५० रुपये खर्च येतो. वाहतूक खर्च धरल्यास हा खर्च २ रुपयांपर्यंत जातो. मात्र मागणी ठप्प झाल्याने सध्या अनेक ठिकाणी ऊस रोपांची विक्री अवघ्या १.५० रुपयांप्रमाणे होत आहे. रोपवाटिका चालक प्रल्हाद पोवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रोपवाटिकांमध्ये चार ते पाच लाख रोपे विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. सध्या मागणी ठप्प झाल्याने रोपवाटिका व्यवसाय तोट्यात करावा लागत आहे. आगामी पंधरा दिवसांतील पावसावरच ऊस रोपवाटिका व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असून शेतकऱ्यांसह रोपवाटिका चालकांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here