कोल्हापूर : गुजरात कोल्हापुरी गुळाची खरेदी सोमवारपासून (दि.१३) अनिश्चित काळासाठी बंद करणार आहे. कलर, सल्फर व केमिकलयुक्त गुळाचा पुरवठा झाल्याने येथील गुळ व्यापारी असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. खरेदी बंदचे पत्रही असोसिएशनकडून कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना पाठवले आहे. गुळ खरेदी बंद झाल्यास समितीच्या गुळ विभागातील सुमारे ३०० कोटींची वार्षिक उलाढाल ठप्प राहणार आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होणाऱ्या गुळापैकी ९० टक्के गुळ हा गुजरातला पाठविला जातो. कोल्हापूर व सांगलीमधून झालेल्या पुरवठ्यामध्ये कलर, सल्फर व केमिकलयुक्त गुळ मिळून आल्याने गुजरातमधील अन्न व औषध प्रशासनाने गुजरातमधील व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे येथील जुना माधवपुरा व पाटण गुळ-साखर व्यापारी असोसिएशनने कोल्हापूर व सांगलीमधून गुळ खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भेसळयुक्त गुळ, वारंवार बंद पडणारे सौदे यामुळे कोल्हापूरची गुळाची बाजारपेठ धोक्यात आली आहे. याकडे समितीने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. समितीमध्ये दिवसाकाठी सुमारे ६० गाड्या गुळाची आवक होते. सौद्यांमधून दिवसाला सुमारे ६० लाख रुपये आर्थिक उलाढाल होते. गेल्या तीन दिवसांपासून सौदे बंद असल्याने सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षाहून जादा उलाढाल ठप्प राहिली आहे.


















