कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यातर्फे ‘ऊस उत्पादन वाढ’ कार्यशाळा, शेतकऱ्यांचा प्रतिसाद

कोल्हापूर : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे येथील यशवंत मंगल कार्यालयात ऊस विकास योजनेंतर्गत ‘ऊस उत्पादन वाढ’ या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) माजी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक, अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते. शेतकऱ्यांनी एआयसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा तसेच बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन ऊस शेती करणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक ऐवजी आधुनिक पद्धतीने ऊस शेतीला प्राधान्य दिल्यास निश्चितच ऊस उत्पादनात वाढ होऊन चांगला आर्थिक लाभ होईल, असे आवाहन सुरेश माने-पाटील यांनी यावेळी केले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या धोरणांची माहिती दिली. ते म्हणाले की, जवाहर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असून, विविध ऊस विकास योजनांच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. कार्यकारी शेती अधिकारी किरण कांबळे यांनी स्वागत केले. सुभाष गोटखिंडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे-यड्रावकर, उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, केन कमिटी चेअरमन दादासाहेब सांगावे, संचालक सूरज बेडगे आदींसह शेतकरी, सभासद उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here