नाशिक: येवला तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मका आणि सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून त्याचा परिणाम एकूण पेरणीवर दिसून आला आहे. तालुक्यातील खरीप पेरणी 75,546 हेक्टरवर झाली असून ती सरासरी क्षेत्राच्या 103.32 टक्के इतकी नोंदवली गेली आहे. दुसरीकडे कापूस आणि उसाच्या नवीन लागवडीमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने पेरणीवर सुरुवातीला परिणाम झाला होता. त्यानंतरही तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला नसल्याने पिके केवळ संततधारेच्या पावसावरच टिकून आहेत. अनेक जलस्रोत अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पाण्याची चिंता कायम आहे.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी यंदा पिकांच्या निवडीत बदल केल्याचे दिसून येत आहे. कमी जोखीम असलेल्या मका, तूर आणि सोयाबीन या पिकांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून सरासरी 39,433 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा 47,290 हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली आहे.कांदा लागवडीसाठी रोपे तयार करण्याच्या उद्देशाने मूगाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या निरीक्षणात आले आहे. अनेक शेतकरी सध्या कांदा रोपवाटिकेची तयारी करत आहेत.
नगदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. कापूस पेरणी केवळ 10.09 टक्क्यांवर, तर उसाची नवीन लागवड 13.44 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल पारंपरिक आणि तुलनेने सुरक्षित पिकांकडे वळल्याचे स्पष्ट होत आहे.कृषी तज्ज्ञांच्या मते, जमिनीत अद्याप पुरेसा ओलावा निर्माण झालेला नसल्याने पिकांची वाढ अपेक्षित वेगाने होत नाही. त्यामुळे खरीप पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि पुढील उत्पादनक्षमतेसाठी मुसळधार पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी व्यक्त करत आहेत.

















