NFCSF च्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या सचिवांची भेट, ‘ओटीएस’मध्ये सवलतीची मागणी

नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) ने देशातील सहकारी साखर उद्योगावर आर्थिक दबाव वाढत असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने धोरणात्मक हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. NFCSF ने सहकारी साखर कारखान्यांसाठी आर्थिक सवलतीच्या उपाययोजनांमध्ये बदल करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः साखर विकास निधी (SDF) अंतर्गत असलेल्या वन टाइम सेटलमेंट (OTS) योजनेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली असून, या योजनेचा अपेक्षित परिणाम झालेला नसल्याचे म्हटले आहे.

NFCSF चे हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे सहकार मंत्रालयाचे सचिव अशिष कुमार भूतानी यांची भेट घेऊन साखर उद्योगासमोरील समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. महासंघाच्या मते, सहकारी साखर कारखाने वाढता ऊस खरेदी खर्च, साखरेचा कमी बाजारभाव आणि शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपी रकमेच्या वाढत्या दबावाला सामोरे जात आहेत. या सर्व कारणांमुळे कारखान्यांची आर्थिक तरलता (लिक्विडिटी) कमी झाली असून, कर्जफेड आणि दैनंदिन कामकाज चालवणेही कठीण झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

‘एनएफसीएसएफ’ने निदर्शनास आणून दिले की, सध्याच्या ओटीएस योजनेत थकीत रकमेवर जास्त व्याज असल्यामुळे कारखान्यांचा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी सामान्य व्याज आणि दंडात्मक व्याजात किमान ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे कारखान्यांना सेटलमेंट करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि वसुलीत सुधारणा होईल, असे महासंघाने स्पष्ट केले.

या आर्थिक अडचणी असूनही, २०२५-२६ हंगामासाठी देशातील साखर पुरवठा स्थिती स्थिर असल्याचे महासंघाने सांगितले. अंदाजे २८ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविल्यानंतर एकूण साखर उत्पादन सुमारे २८१ लाख टन राहील. सुरुवातीचा ५० लाख टन साठा गृहीत धरता एकूण उपलब्धता ३३१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ही उपलब्धता देशांतर्गत सुमारे २८० लाख टन खप पूर्ण करण्यासाठी आणि सुमारे १० लाख टन निर्यातीसाठी पुरेशी मानली जाते. हंगामाच्या अखेरीस साठा ४१ लाख टन राहण्याचा अंदाज आहे, जो २०१६-१७ नंतरचा सर्वात कमी असला तरीही व्यवस्थापन योग्य पातळीवर असल्याचे म्हटले आहे.

तथापि, उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील तफावत साखर उद्योगासाठी मोठी अडचण ठरत आहे. सध्या साखरेचा सरासरी एक्स-मिल दर सुमारे ₹३,८५० प्रति क्विंटल आहे, तर उत्पादन खर्च सुमारे ₹४,१०० प्रति क्विंटल आहे. प्रति क्विंटल सुमारे ₹२५० चा कारखान्यांना तोटा होत असून, त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत आहेत आणि शेतकऱ्यांना देयके देण्यास विलंब होत आहे.एनएफसीएसएफने स्पष्ट केले की, सहकारी साखर कारखाने स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळण्यासाठी सरकारचा वेळेवर हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच, साखर उद्योगाच्या दीर्घकालीन स्थैर्य आणि आर्थिक सुदृढतेसाठी धोरणकर्त्यांसोबत सहकार्य करण्याची बांधिलकी महासंघाने पुन्हा व्यक्त केली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here