पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने दीड एकरात घेतले उसाचे १०० टन उत्पादन

पुणे : सध्या बाजारात इतर पिकांना मिळणारा भाव अनिश्चित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. अशा परिस्थितीत ऊस हे एकमेव हमीभाव देणारे पीक आहे. कमी श्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते हे दाखवून देताना जुन्नर तालुक्यातील पिंपरी कावळ येथील प्रगतशील शेतकरी संदीप जाधव व किरण जाधव यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवडीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गव्हाच्या काढणीनंतर जमिनीची योग्य मशागत करून त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रामध्ये ८६०३२ या सुधारित ऊस वाणाची नियोजनबद्ध लागवड केली आहे. जाधव हे सलग तिसऱ्या वर्षी उसाची शेती करत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी याच दीड एकर क्षेत्रातून १०० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले होते. सर्व खर्च वजा जाता त्यांना २ लाख ५० हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळाल्याचे दैनिक ‘प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे. त्यांनी या लागवडीसाठी ९००० उसाच्या रोपांचा वापर केला. दोन रोपांमधील अंतर सव्वा फूट ठेवले आहे. प्रति रोप साधारण २ रुपये ५० पैसे याप्रमाणे केवळ रोपांवर सुमारे २२ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आला आहे. योग्य अंतर, शास्त्रीय पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे या पिकातून अधिक उत्पादन मिळण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. जाधव दांपत्याच्या या नवीन प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरीही आधुनिक शेतीकडे आकर्षित होत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here