वाळवा : किरण नायकवडी, केदार नायकवडी आणि गौरव नायकवडी यांनी सोमवारी येथे हुतात्मा साखर कारखान्यातील कथित साखर घोटाळा, गैरव्यवहार आणि कारभारातील अनियमिततेच्या निषेधार्थ आंदोलन केले. या आंदोलनात सभासद शेतकरी सहभागी झाले. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेली २० वर्षे एकहाती चाललेल्या कारभारामुळे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. साखर चोरीबाबत आम्ही केलेल्या तक्रारींची दखल घेऊन साखर संचालकांनी अहवाल दिला आहे. सुमारे साडेपाचशे कोटींचा घोटाळा आहे असा आरोप किरण व गौरव नायकवडी यांनी केला. यावेळी अधिक डवंग, भास्कर शेळके, वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, जगन्नाथ तोडकर, भीमराव देसाई, सिराज वांकर, इसाक वलंडकर, अरुण यादव, वसंत पाटील आदींची भाषणे झाली. माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारखान्यावर सुरू असलेले हे आंदोलन सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असा इशारा किरण, केदार आणि गौरव नायकवडी यांनी दिला. किरण नायकवडी म्हणाले की, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. मात्र, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तातडीने निर्णय घ्यावा. प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. तर केदार नायकवडी म्हणाले की, आम्ही साखर चोरीबाबत केलेल्या तक्रारींची दखल घेऊन साखर संचालकांनी अहवाल दिला आहे. हा सुमारे साडेपाचशे कोटींचा घोटाळा आहे. गौरव नायकवडी यांनी गेली २० वर्षे एकहाती चाललेल्या कारभारामुळे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे सांगितले.

















