सांगली : दिवंगत स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी उसाला चांगला दर, कामगारांना योग्य वेतन आणि साखर कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापनही उत्तम सांभाळता येते, हे सिद्ध केले. त्यामुळेच त्यांचा ‘हुतात्मा पॅटर्न’ राज्यभरच नव्हे तर देशाच्या सहकार क्षेत्रात गाजला. या कारखान्याने राज्य तसेच देशपातळीवर जवळपास पन्नास पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांनी एक नव्हे असंख्य प्रयोग करून ही साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या हितासाठी कशी चालविता येते याचा आदर्श घालून दिला आहे. मात्र, संचालक गौरव नायकवडी, किरण नायकवडी, आणि केदार नायकवडी यांनी चेअरमन वैभव नायकवडी यांच्यावर कथित भ्रष्ट कारभाराचा आरोप करत टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यातील नेमके सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.
नागनाथअण्णांनी सहकारी साखर उद्योगात सर्वात चमकदार कामगिरी करीत सुयोग्य आर्थिक, सामाजिक नियोजन कसे करायचे, याचे उदाहरण घालून दिले होते. राज्यात साखर उताऱ्यात अव्वल, दरात प्रथम अन् वेतनवाढ देण्यातही सर्वात पुढे असलेल्या या कारखान्याची आज प्रचंड बदनामी झाली आहे. खरे तर नागनाथअण्णांनी आयुष्यभर स्वतः व कुटुंबीयांना कारखान्याच्या पदांपासून दूर ठेवले. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे धाकटे पुत्र वैभव नायकवडी यांच्या हाती कारखान्याची धुरा आहे. सध्याच्या संचालक मंडळात वैभव यांच्यासह त्यांचे पुतणे गौरव तसेच नागनाथअण्णांच्या कन्या विशाखा असे तीन संचालक आहेत. कारखाना सध्या गैरकारभाराच्या आरोपाने ग्रासला आहे. वैभव यांच्या हाती कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा वीस वर्षांपासून आहे. त्यांचे थोरले बंधू किरण नायकवडी, पुतणे गौरव व केदार या तिघांनीही वैभव यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. साडेपाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. यामुळे हुतात्मा संकुल पहिल्यांदाच नकारात्मक गोष्टीने चर्चेत आले आहे.

















