सातारा : जागतिक महिला वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे महिलांच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संग्राम पाटील यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी सुनीता चव्हाण यांनी एकत्रितरित्या घरगुती सोयाबीन उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक सादर केले. या शेतीशाळेमध्ये गटातील १८ महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांनी घरगुती सोयाबीन उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुवर्णा कणसे, पूनम सावंत, कांचन जाधव, गावचे सरपंच, उपसरपंच, उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्रज्ञ संग्राम पाटील म्हणाले की, ऊस पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियंत्रणासाठी वेगवेगळ्या सापळ्यांचा उपयोग करावा. हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे, एरंडी आंबवण सापळे व कामगंध सापळे यासारख्या वेगवेगळ्या सापळ्यांचा उपयोग करावा. पहिला पाऊस झाला की, प्रकाश सापळे लावावेत. एरंडी आंबवण सापळा एक किलो एरंडीचा कीस करून, २०० मिली ताक वापरून एक लिटर पाण्यात करता येतो. फेरोमेन ट्रॅपसारखे सापळे वापरल्यानंतरसुद्धा त्याकडे कीटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांनी एल निनो प्रवाहांमुळे शेतीतील पिकांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले. सहाय्यक कृषी अधिकारी सुजीत शिंदे यांनी सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शन केले. नम्रता बर्गे व प्रतीक्षा कोळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मयूरी महांगडे यांनी आभार मानले.


















