सोलापूर : साखर उद्योग आर्थिक अडचणीत, गुळाला मात्र, ४,५०० रुपयांपेक्षा जादा दर

सोलापूर : साखर उद्योगाकडे सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे ३,७०० रुपये असताना गुळाला मात्र बाजारात अधिक दर मिळत असल्याचे चित्र आहे. सोलापूर बाजारात गुळाचे दर ४,५०० ते ५,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले असून, गुळाला सध्या चांगली तेजी आहे. गुढीपाडव्यापासून बाजारात गुळाचे दर वाढले आहेत. तेव्हा ४,२०० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण गुळाचे दर होते, आता ते ४८०० रुपयांपर्यंत असल्याचे व्यापाऱ्यांनी दैनिक ‘सकाळ’ला सांगितले. जिल्ह्यातील माढा, मोहोळ, माळशिरस व उत्तर सोलापूर तालुक्यात सेंद्रिय गूळ व काकवी निर्मिती प्रकल्प आहेत. सध्या सेंद्रिय गुळाला प्रतिकिलो ७० रुपये तर काकवीचा प्रतिलिटर दर १०० रुपये असल्याचे उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील गूळ उद्योजक श्रीराम पाटील यांनी दैनिक ‘सकाळ’ला सांगितले.

जिल्ह्यात गुऱ्हाळांची संख्या कमी झाल्यामुळे आवक घटली आहे. याच कारणामुळे दरवाढ होत आहे. गेल्या काही वर्षात गुळाची मागणी कमी झाल्याने गुऱ्हाळांची संख्याही स्थिर आहे. रोख पैसे मिळत असल्याने काही शेतकरी गूळ निर्मितीकडे वळतात. पूर्वी सोलापूरमधून गुजरातसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची निर्यात होत होती. मात्र, अलीकडच्या काळात लातूर बाजारपेठेचा प्रभाव वाढल्यामुळे सोलापूरमधील आवक घटली सध्या कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातून एक दिवसाआड गुळाची आवक होत आहे. सध्या गुळाचा दर प्रतिक्विंटल ४,५०० – ५,००० रुपये आहे. तर उत्कृष्ट दर्जाचा गुळ प्रतिकिलो ५५-६० रुपये या दराने मिळत आहे. कर्नाटकातून होणारी गुळाची आवक एप्रिलनंतर थांबण्याची शक्यता आहे असे आडत व्यापारी प्रकाश जावळे यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here