पुणे : चुनखडीयुक्त जमिनीतील ऊस उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी माती परीक्षणावर आधारित एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जमिनीचा वाढलेला सामू, चुनखडीचे अधिक प्रमाण, सेंद्रिय कर्बाची कमतरता आणि अन्नद्रव्यांची कमी उपलब्धता यामुळे उसाची वाढ, मुळांची कार्यक्षमता आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. यावर उपाय म्हणून संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय पदार्थांचा वापर, जैविक घटक आणि योग्य सिंचनाचे नियोजन करावे, असे मार्गदर्शन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या डॉ. क्रांती निगडे व डॉ. समाधान सुरवसे यांनी केले आहे.
याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, चुनखडीयुक्त जमिनीत प्रामुख्याने स्फुरद, लोह, जस्त आणि मँगेनीज या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. त्यामुळे मुळांची वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे आणि फुटव्यांची संख्या कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. यासाठी लागवडीपूर्वी माती परीक्षण करून चुनखडीचे प्रमाण, सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासावे. त्यानुसार खतांचा वापर करावा.
याबाबत डॉ. निगडे यांनी सांगितले की, जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी कुजलेले शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, कुजलेली मळी, पाचटाचे आच्छादन आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा. चुनखडीचा कठीण थर असल्यास योग्य ठिकाणी खोल नांगरणी किंवा सबसॉईलरचा वापर करावा. लोह व जस्ताच्या कमतरतेसाठी शिफारशीनुसार झिंक सल्फेट, फेरस सल्फेट किंवा चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा पुरवठा केल्यास अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जिवाणू, स्फुरद व पालाश विरघळविणारे जिवाणू आणि चुनखडी विरघळविणाऱ्या जिवाणूंचा शिफारशीनुसार वापर करावा. ह्युमिक अॅसिडसारख्या घटकांमुळे जमिनीतील जैविक क्रियाशीलता आणि मुळांची वाढ सुधारण्यास मदत होते.

















